पैसे मोजायला बसा पण धूराने भरलेल्या खोलीत.
पैसे मोजायला बसा पण धूराने भरलेल्या खोलीत.
—————————————-
एका बंद खोलीत अब्जावधी रूपयांच्या नोटा ठेवल्यात. हे पैसे तूम्हाला मोजत बसायचेयत.
यातले हवे तेवढे पैसे तूम्ही घेऊ शकताय. आणि हि खोली साधीसुधी नाही. जादूची आहे बरं का !
काय आहे इथली जादू ?
इथली जादू अशी आहे कि या खोलीत एक धूर निर्माण करणारे यंत्र आहे. हे यंत्र तूम्ही जेवढावेळ चालू ठेवाल तेवढा धूर या यंत्रातून बाहेर निघत राहिल. आणि जेवढा धूर निघत राहिल तेवढे पैसेही इथे तयार होत रहातील. हे यंत्र चावण्याचे प्रशिक्षण घ्यायचे कि तूम्हाला या खोलीत शिरायचा प्रवेश मिळालाच म्हणून समजा. या खोलीत सगळ्या सुख सुविधा आहेत. खाण्यापिण्यासाठी सुद्धा सगळं काही इथेच मिळत.
तूम्हाला हे यंत्र चालवता येत नसेल तरी काही हरकत नाही. ज्यांना हे यंत्र चालवता येते ते यंत्रावर काम करतील. बाकिच्यांनी इतर सेवा देण्याचे काम करायचे.
कशी वाटली कल्पना ?
आज मी पनवेल हून अलिबागकडे येत होतो. कर्नाळ्याच्या जंगलातून माझी एस टी बस हळूहळू पुढे येत होती. जंगलाचा मंद सुगंध एस टी च्या खिडकीतून आत येणाऱ्या वारयाबरोबर जाणवत होता. जंगलातील शुद्ध हवा , प्राणवायू मिळाल्याने प्रसन्न वाटत होते. पुढे माझी बस पेण वडखळ च्या दिशेने जाऊ लागली. जसजसे वडखळ जवळ आले तसे वातावरणातील एक वेगळाच कळकट गंध जाणवू लागला. बाहेरील शुद्ध वातावरणातून एका धूराने भरलेल्या बंद खोलीत आल्यासारखे वाटू लागले. जीव कोंडल्या सारखा झाला. हा धूर वडखळ जवळ असलेल्या एका लोखंडाची उत्पादने बनविणारया कारखान्याचा होता. पुढे पोयनाड पेझारी पर्यंत हा कळकट गंध जाणवत होता. मग एस टी बस कार्लेखिंडीकडे आली आणि हा गंध थोडा कमी झाला. मनातल्या मनात मी देवाचे आभार मानले कि त्याने मला चौल रेवदंड्या सारख्या शुद्ध हवेच्या ठिकाणी ठेवले आहे. एसटीच्या वडखळ ते पेझारी या काही मिनिटांच्या प्रवासात जर माझा जीव कोंडतोय तर इथल्या गावांमध्ये हि लोकं कायमची कशी रहात असतील ?
असाच काहीसा अनुभव मागे मला चिपळूण जवळील लोटे परशूराम येथेही आला होता.
शुद्ध हवा , शुद्ध पाणी हिच आहे आपली खरी संपत्ती हे आपल्या लोकांना आणि आपल्या सरकारला कधी कळणार देवच जाणे.
लेखक : शैलेश राईलकर , पर्यावरण आणि कोकणमित्र.
चौल , अलिबाग.